आरंभ मराठी / धाराशिव
यंदाच्या मार्च आणि एप्रिल महिन्यात धाराशिव जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस पडला होता. यामधे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देणारा निर्णय शासनाने घेतला असून, बाधित शेतकऱ्यांसाठी २ कोटी ८४ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, जिल्ह्यातील २,२०४ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे १ हजार ५१०.३२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.
नुकसानग्रस्त भागांमध्ये कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त पथकांनी पंचनामे करून नुकसानाची माहिती संकलित केली होती. त्यानंतर संबंधित मदतीचा प्रस्ताव मे महिन्यात कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावाची शासनस्तरावर छाननी झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २८४.१५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
यापूर्वी मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळेही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी ३ हजार ३१५ शेतकऱ्यांच्या १ हजार ६६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्या नुकसानीपोटी शासनाने ३ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मार्च आणि एप्रिल या सलग दोन महिन्यांतील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत एकूण ६ कोटी २३ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असताना ही मदत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार असून, मंजूर निधीचे तातडीने वितरण करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.












