4 बिबट्याची शक्यता,आता वाघाचीही दहशत
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याची दहशत सुरू असतानाच आता जिल्ह्यात वाघ आढळला असल्यामुळे भीती वाढली आहे. येडशी परिसरात मागील चार दिवसापासून बिबट्याने वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली होती. या हल्ल्यामध्ये एका गाईचा बळी गेला असून, एक गाय गंभीरित्या जखमी झाली आहे. या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाकडून येडशी परिसरात 15 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. यातील एका ट्रॅप कॅमेऱ्यात शुक्रवारी रात्री वन विभागाला वाघ दिसला असून, जिल्ह्यात प्रथमच वाघ दिसल्यामुळे वन विभाग देखील चक्रावून गेले आहे. धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात एकदाही वाघ आढळलेला नव्हता.
शुक्रवारी रात्री उशिरा धाराशिव-बार्शी रस्त्यावरील धाराशिवच्या सीमा हद्दीच्या कमानीजवळ लावलेल्या एका ट्रॅप कॅमेरात वाघ दिसला असून, हा वाघ अडीच ते तीन वर्षाचा नर असल्याची माहिती वन विभागाने दिली.
रामलिंग अभयारण्यात सध्या मुबलक पाणी आणि इतर जनावरांचा आढळ असल्यामुळे वाघासाठी हे अभयारण्य अनुकूल झाले आहे. मागील चार दिवसात येडशी परिसरात पाळीव प्राण्यांवर जे हल्ले झाले ते हल्ले देखील या वाघानेच केले असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली. हा वाघ सध्या रामलिंग अभयारण्याच्या आसपासच असून, या भागातील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
विशेषतः अभयारण्य परिसरात पाळीव जनावरे चारण्यासाठी कोणीही आणू नये असे आवाहन केले आहे.
इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ
धाराशिव जिल्ह्याच्या पर्यावरणाचा अभ्यास केला असता, जिल्ह्यातील वातावरण वाघासाठी कधीही अनुकूल नव्हते. मराठवाड्यात 1970 च्या दशकात शेवटचा वाघ आढळला होता. त्यातल्या त्यात बीड जिल्ह्यामध्ये 1930 ला शेवटचा वाघ आढळला होता. धाराशिव जिल्ह्यात मात्र एकदाही वाघाचे अस्तित्व आढळून आलेले नाही. आता वाघ आढळल्यामुळे वन वन विभागाला देखील धक्का बसला असून, सध्या वन विभागाकडून फक्त लोकांना सतर्क करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून सध्या कुठलेही प्रयत्न केले जात नसून, हा वाघ या परिसरात न राहता लगेच निघून जाईल असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बिबट्या हा प्राणी परिस्थितीशी जुळवून घेतो परंतु, वाघाला परिस्थितीशी जुळवून घेता येत नसल्यामुळे हा वाघ या भागातून स्वतः निघून जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा वाघ कर्नाटक राज्यातून आला असण्याची देखील शक्यता त्यांनी व्यक्त केली.
मात्रेवाडीतील शेतकऱ्यावर हल्ला हा वाघाचाच?
मागील आठवड्यात भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. परंतु हल्ला करणाऱ्या प्राण्याचे ठसे हे बिबट्याचे नसून वाघाचे असल्याची शंका विभागाच्या काही अधिकार्यांनी तेंव्हा व्यक्त केली होती. या ठशांचा अभ्यास करण्यासाठी हे ठसे एक्स्पर्ट टीमकडे देखील पाठवले होते. त्यातच हा वाघ आढळल्यामुळे मात्रेवाडी येथील शेतकऱ्यावर केलेला हल्ला हा या वाघानेच केला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जनावरे सुरक्षित स्थळी बांधा, वन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
आढळलेला वाघ हा नर येडशी परिसरात आढळलेला वाघ हा अडीच ते तीन वर्षांचा नर असून, तो प्रचंड चपळ आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांचे पशुधन संरक्षित ठिकाणी बांधावे, असे आवाहन देखील वनविभागाने केले आहे. सध्या बिबट्याला पकडण्यास आलेली पुणे येथील रेस्क्यू टीम परत गेली असून, वन विभागाकडून हा वाघ नेमका कुठे आहे, याचा शोध घेतला जात आहे. वाघाला पकडण्यापेक्षा तो स्वतः या भागातून निघून जाईल, अशी शक्यता वन विभागाने व्यक्त केली. शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे रामलिंग अभयारण्यात आणू नये, असेही आवाहन केले आहे.