आरंभ मराठी / धाराशिव
२०२२ मधील गद्दारीच्या वेळी कैलास पाटील यांच्या पायाशीही संपत्तीची रास आणि खोक्यांचं आमिष होतं. मात्र त्यांनी त्या सर्वाला लाथाडत शिवसेनेशी इमान राखलं. गाडीतून उडी मारून पायी चालत आलेला कैलास हा खरा शिवसैनिक आहे,अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार कैलास पाटील यांच्या निष्ठेचं जाहीर कौतुक केले.
धाराशिव येथे आयोजित मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी २०२२ मधील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला.
ते म्हणाले, गद्दारीच्या वेळी आमदारांना गाड्यांमधून घेऊन जात असताना कैलास पाटील यांनी मला फोन करून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी सुरतच्या सीमेवर गाडीतून उडी मारून जीवाची पर्वा न करता पायी प्रवास केला. त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. त्यांना सुरक्षित आणण्याची व्यवस्था करण्यात आली. त्या काळात त्यांच्या समोरही संपत्तीची रास आणि खोक्यांचं मोठं आमिष होतं, पण त्यांनी ते सर्व नाकारत शिवसेनेशी निष्ठा कायम ठेवली. हाच खरा शिवसैनिक आहे.
यावेळी खासदार संजय राऊत यांनीही आमदार कैलास पाटील यांच्या निष्ठेचं कौतुक करत समाधान व्यक्त केलं.
तत्पूर्वी आमदार कैलास पाटील म्हणाले, निष्ठा ही बोलून दाखवायची गोष्ट नसते, ती कृतीतून सिद्ध करावी लागते. उद्धव साहेबांची साथ मी कधीही सोडणार नाही, हा माझा शब्द आहे.
शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी, कोणतीही परिस्थिती आली तरी मी शिवसैनिकांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाहीही दिली.आजच्या या मेळाव्याला शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली होती.








