आरंभ मराठी / धाराशिव
शिवसेना पक्षात बंडखोरी करून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आज धाराशिव शहरात पार पडली. या सभेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत अनेक गंभीर आरोप केले.
भाषणाच्या सुरुवातीलाच राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांना उद्देशून, ओमराजे यांना धाराशिवच्या रस्त्यावर फिरू देऊ नका, असे आवाहन केले. धाराशिवमध्ये आता ऑपरेशन तुडवा सुरू झाले असून ते निश्चित यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले, पंधरा वर्षे आम्ही एका सापाला विष पाजले. त्याच्यावर विश्वास ठेवला, पण त्यानेच गद्दारी केली. पुढे त्यांनी ओमराजे यांचा उल्लेख भामटा आणि सोंगाड्या असा करत, त्यांनी निष्ठेच्या खोट्या शपथा घेत शिवसेनेशी विश्वासघात केल्याचा आरोप केला. ठाकरे कुटुंबाने त्यांना प्रेम दिले, पक्षाने आमदार केले, खासदार केले, सर्व प्रकारचे राजकीय बळ दिले. तरीही त्यांनी गद्दारीचा मार्ग स्वीकारला, असे राऊत म्हणाले. तसेच धाराशिवचा खासदार शंभर कोटी रुपयांना विकला गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
राऊत यांनी ७ मे २०२४ रोजी भूम तालुक्यातील पाट सांगवी येथे शिवसैनिक समाधान पाटील यांच्या झालेल्या हत्येचाही उल्लेख केला. त्या हत्येतील आरोपींच्या गोटात आज ओमराजे सामील झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
याशिवाय ओमराजे निंबाळकर यांच्या बँका आणि पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, त्या प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचेही राऊत म्हणाले. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचाही उल्लेख करत, त्या हत्येमागेही वेगळे काहीतरी रहस्य आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
पुढे बोलताना राऊत यांनी पवनराजे मल्टीस्टेटने धाराशिव शहरात सुमारे ५०० कोटी रुपयांचे भूखंड खरेदी केल्याचा दावा केला. त्या व्यवहाराची ईडी कडून चौकशी सुरू झाल्यानंतरच पक्षांतराचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला.










