अमोलसिंह चंदेल / आरंभ मराठी
शिराढोण –
रविवारी मध्यरात्री झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसाने अक्षरशः त्रेधा तिरपीट उडाली असून, लातूर–कळंब मार्गावरील खडकी येथे पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे लातूर–कळंब मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून प्रशासनाने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
खडकी येथील पुलाशेजारील भागात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी आल्याने पर्यायी रस्त्याचे नुकसान झाले. परिणामी या मार्गावरील वाहनांची ये-जा थांबविण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत होईपर्यंत कळंबकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी एकुरका–जवळा या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी लातूर विभागाचे अभियंता बिराजदार तसेच संबंधित कंत्राटदार यांच्याशी चर्चा करून रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या.
तहसीलदार ढोकले यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नुकसानग्रस्त भागात आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले असून, वाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. दरम्यान, वाहनचालकांनी बंद रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न न करता प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.









