१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; हरित धाराशिव अभियान २.०ची विक्रमी भरारी
आरंभ मराठी / धाराशिव
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने धाराशिव जिल्ह्याने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. हरित धाराशिव अभियान २.० अंतर्गत १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. या मोहिमेची १२ तासांत सर्वाधिक मोठी मियावाकी वृक्षारोपण मोहीम म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.जिल्हा प्रशासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमात सेरेंटिका रिन्यूएबल्सने महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला. कंपनीच्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी शिंगोली येथे प्रत्यक्ष वृक्षलागवडीत सहभाग घेतला.
शिंगोली येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सेरेंटिका रिन्यूएबल्सच्या योगदानाचे कौतुक केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते कंपनीचे एव्हीपी – एनेबलमेंट सर्व्हिसेस टी. एम. हेमनाथन यांचा सत्कार करण्यात आला.
सेरेंटिका रिन्यूएबल्सचे एव्हीपी सुरजीत नारायण यांनी या उपक्रमात सहभागी होताना कंपनीचा पर्यावरण संवर्धनासोबतच हरित आणि समृद्ध धाराशिवच्या निर्मितीसाठीही कटिबद्ध असल्याचे सांगितले.
१०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग
कंपनीचे इंडिया हेड – एनेबलमेंट सर्व्हिसेस विक्रम अय्यंगार यांच्या नेतृत्वाखाली १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. स्वच्छ ऊर्जेसोबतच पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याची कंपनीची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
सेरेंटिका रिन्यूएबल्सकडून कळंब येथे ४४० मेगावॅट आणि सोलापूर येथे ४०० मेगावॅट पवन ऊर्जा क्षमतेचा विकास सुरू आहे.
गतवर्षीच्या मोहिमेतील ८५ टक्के वृक्ष जिवंत
हरित धाराशिव अभियानाचा हा सलग दुसरा मोठा वृक्षलागवड उपक्रम आहे. गतवर्षी जिल्ह्यात २४ तासांत सुमारे १५ लाख रोपांची लागवड करण्यात आली होती. प्रशासनाच्या माहितीनुसार, त्यापैकी सुमारे ८५ टक्के वृक्ष सध्या जिवंत आहेत. लागवड केलेल्या वृक्षांच्या स्थितीचा दर सहा महिन्यांनी आढावा घेण्यात येणार असून, त्यांच्या संगोपनावर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या संकल्पनेतून २०४७ पर्यंत राज्यात तीन अब्ज वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्याच दिशेने धाराशिव जिल्ह्यात प्रशासन, नागरिक आणि विविध संस्थांच्या सहभागातून वृक्षलागवडीची व्यापक मोहीम उभारली जात आहे.









