आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील वाटचालीला महत्त्वाचे यश मिळाले आहे. महाविद्यालयात पदव्युत्तर (पीजी) वैद्यकीय शिक्षणाचे विभाग सुरू करण्यास मान्यता मिळाली असून, यामुळे धाराशिवच्या वैद्यकीय क्षेत्राला नवी ओळख प्राप्त होणार आहे. पीजी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयाने मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली असून, आता पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात झाली. अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत महाविद्यालयाने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यापर्यंत मजल मारली आहे. सन २०२५ पासूनच पीजी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी राज्य शासनाने ऑक्टोबर २०२५ मध्ये मान्यता दिली होती. त्यानंतर आवश्यक पाहणी आणि तपासणी प्रक्रिया पार पडली. २६ एप्रिल २०२६ रोजी विद्यापीठाकडूनही मान्यता मिळाली होती.
एप्रिल महिन्यात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याच्या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करण्यात आली होती. या सर्व प्रक्रियेनंतर आता पीजी विभागांना मंजुरी मिळाल्याने महाविद्यालयाच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
सध्या महाविद्यालयात एकूण २२ विभाग कार्यरत असून, त्यापैकी १८ विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहेत . महाराष्ट्रातील ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी पीजी अभ्यासक्रमासाठी अर्ज केले होते, त्यामध्ये धाराशिवच्या महाविद्यालयाने देखील काही जागांची मागणी केली होती.
या जागांना मंजुरी मिळाल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या पुढील टप्प्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे १५ नोव्हेंबर पासून दुसऱ्या प्रवेश फेरीत धाराशिव येथील पीजी अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होणार आहेत. पीजी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्राध्यापक, तज्ज्ञ डॉक्टर आणि आवश्यक मनुष्यबळ महत्त्वाचे असते. मागील दोन वर्षांत महाविद्यालयात मनुष्यबळ आणि इतर सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. यापूर्वी महाविद्यालयात केवळ ३२ टक्के कर्मचारी उपलब्ध होते. आता ही संख्या ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सध्या १२ कंत्राटी प्राध्यापक कार्यरत आहेत. वाढलेले मनुष्यबळ आणि उपलब्ध सुविधांमुळे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे आणि त्याचे नियमित संचालन करणे शक्य होणार आहे. महाविद्यालयाच्या रुग्णसेवेतही लक्षणीय वाढ झाली आहे. यापूर्वी दररोज सुमारे ८०० रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) नोंद होत होती. आता ही संख्या वाढून दररोज सुमारे १३०० वर पोहोचली आहे. पदव्युत्तर विभाग सुरू झाल्यानंतर विविध वैद्यकीय शाखांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार असून, गंभीर आजारांवरील उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील.
परिणामी रुग्णसेवेची गुणवत्ता वाढण्यासह गंभीर रुग्णांना बरे होण्यास अधिक मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील तसेच परिसरातील रुग्णांना उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरजही काही प्रमाणात कमी होऊ शकते. वैद्यकीय शिक्षणासाठी शरीररचनाशास्त्र विभागात देहदानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत १४ देहदान झाले असून, सध्या महाविद्यालयाकडे १५ देह उपलब्ध आहेत. यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. अवघ्या पाच वर्षांत पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यासाठी धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने केलेली प्रगती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ७७ जागा, १८ विभागांतील पदव्युत्तर शिक्षणाची संधी, वाढलेले मनुष्यबळ आणि विस्तारणारी रुग्णसेवा यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य सुविधांना नवी दिशा मिळणार आहे.










