आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात यंदा निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू आणि दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात २० ट्रक जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या असून, या शिध्याचे वाटप येत्या २ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यासाठी पालकमंत्री सरनाईक हे सोमवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेच्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करण्यात आले आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांसाठी पहिल्या टप्प्यात २० ट्रक शिधा पाठविण्यात आला आहे. या शिध्याचे पुढील आठवड्यात वितरण करण्यात येणार असून, त्याची सुरुवात २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दौऱ्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर तसेच शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्री प्रताप सरनाईक हे २ नोव्हेंबर रोजी पुण्याहून धाराशिव जिल्ह्यात येणार आहेत. त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार सायंकाळी ५ वाजता तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे आगमन होणार असून, तेथे दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे पोहोचून शिधा वाटप कार्यक्रमात सहभागी होतील.
सायंकाळी ७.३० वाजता लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी येथे त्यांचे आगमन होणार असून, तेथेही दुष्काळग्रस्तांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात येणार आहे. या तीन ठिकाणच्या कार्यक्रमांनंतर रात्री ९.३० वाजता पालकमंत्री तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत.
त्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम असणार आहे.
दरम्यान, माजी मंत्री तथा आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांनीही भूम आणि परंडा तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागात शिधा व साखर वाटपाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांत शिवसेनेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त कुटुंबांपर्यंत दिवाळीच्या काळात जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.










