आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये सोलापूर येथील सराईत मटका किंग यांना गाभाऱ्यातून दर्शन दिल्याप्रकरणी मंदिर संस्थांनने अखेर दोन दिवसांनी कारवाई केली. मंदिर संस्थानने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले यांना निलंबित केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरू असून या नवरात्र महोत्सवामध्ये सोलापूर येथील अरुण प्रभाकर रोडगे यांनी मंदिराच्या मुख्य गाभार्यात जाऊन दर्शन घेतले होते.
यासंदर्भातील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यामुळे मंदिर संस्थानच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित होत होत्या. याबाबत भोपे पुजारी मंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरातील सहाय्यक धर्मिक व्यवस्थापक अमोल भोसले यांना या प्रकरणात निलंबित करण्यात आले असून अजूनही काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
*चोर सोडून संन्याशाला फाशी -*
मंदिर संस्थांनने केलेली कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशीच आहे. याबाबत आमदारांनी दिलेल्या आश्वासनानुसार सखोल चौकशी करून सर्व दोषी असलेल्यांवर योग्य ती कारवाई करावी. ड्रग्स प्रकरणाप्रमाणे मुख्य सूत्रधारास बाजूला ठेवून कारवाई करण्यात येऊ नये अशी भोपे पुजारी मंडळाची मागणी आहे.
—-
अमरराजे परमेश्वर
अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ










