आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरात आग लागली तर अग्निशमन दलाची गाडी दुसऱ्या तालुक्यातून येण्याची वाट पाहावी लागते. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव नगरपालिकेकडे स्वतःची अग्निशमन गाडी नाही. ही आजची परिस्थिती नाही. वर्षानुवर्षे हाच प्रकार सुरू आहे. आगीच्या घटना घडतात, नुकसान होते, जीव जातात; मात्र नगरपालिकेच्या कारभारात फरक पडत नाही. येडशी येथील भीषण अग्निकांडात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर नगरपालिकेच्या या बेफिकीर कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दिवाळीच्या सणादरम्यान धाराशिव तालुक्यातील येडशी येथे करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट सेंटर या दुकानासह घराला रात्री भीषण आग लागली. आगीने काही वेळातच संपूर्ण घराला वेढा घातला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेतली. मात्र, धाराशिवमध्ये अग्निशमन दलाची गाडीच नसल्याने तुळजापूर आणि कळंब येथून गाड्या बोलवाव्या लागल्या. या दुर्घटनेत उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे या सहा जणांचा मृत्यू झाला.
मुलाला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या पित्यालाही आपला जीव गमवावा लागला. एका कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने येडशीसह संपूर्ण जिल्हा हादरला.
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पहाटे घटनास्थळी धाव घेतली. खासदार ओमराजे निंबाळकर, पदवीधर आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील आणि आमदार कैलास पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाला आवश्यक सूचना करण्यात आल्या.लोकप्रतिनिधी संवेदनशील असले तरी प्रशासन बेफिकीर आहे.
_
प्रत्येक वेळी दुसऱ्या तालुक्याच्या गाड्यांचीच प्रतीक्षा,
धाराशिव शहराचा विस्तार वाढतोय. बाजारपेठा वाढत आहेत. मोठमोठी दुकाने, व्यापारी संकुले आणि रहिवासी इमारती उभ्या राहत आहेत. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली अग्निशमन यंत्रणा उभारण्यात नगरपालिकेला अद्याप यश आलेले नाही. शहरात आग लागली की कळंब, तुळजापूर, उमरगा किंवा अन्य ठिकाणांहून अग्निशमन गाडी मागवायची. यापूर्वीही अनेकदा ही नामुष्की ओढवली आहे. गेल्या आठवड्यात जुनोनी येथे उसाला आग लागल्यानंतर औसा येथून अग्निशमन गाडी मागवावी लागली. गतवर्षी ताजमहाल टॉकीज परिसरातील दुकानांना आग लागली, त्यावेळी तुळजापूर येथून गाडी बोलवावी लागली होती. वारंवार अशा घटना घडूनही नगरपालिकेने धडा घेतल्याचे दिसत नाही. सामाजिक कार्यकर्ते सुनील मुंडे म्हणाले गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच पालिकेला अग्निशमन दलाची गाडी कायमस्वरूपी उपलब्ध करून ठेवा,अशी मागणी केली होती. मात्र प्रशासन आणि कारभारी सगळ्यांनीच याकडे दुर्लक्ष केले.यांच्या दुर्लक्षित कारभाराने आज अख्खे कुटुंब जिवानिशी गेले. आता पालिकेला जाग आली नाही तर यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
सहा मृत्यूंनंतर तरी प्रशासन हलणार का?
अग्निशमन गाडी ही नगरपालिकेची चैनीची बाब नाही, तर नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठीची अत्यावश्यक गरज आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयातच ही व्यवस्था नसणे ही गंभीर बाब आहे. प्रत्येक दुर्घटनेनंतर अन्य तालुक्यांतील गाड्यांवर अवलंबून राहायचे आणि नंतर पुन्हा सर्व काही विसरून जायचे, हा कारभार किती दिवस चालणार, येडशीतील सहा जणांचे मृत्यू ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. आता तरी नगरपालिकेने अग्निशमन गाड्या, प्रशिक्षित कर्मचारी आणि आवश्यक यंत्रणा उभी करण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा.









