आरंभ मराठी / धाराशिव
राज्यातील शेतकऱ्यांची हमीभाव खरेदी केंद्राची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रांची सुरुवात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असून, प्रत्यक्ष खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल.
यंदा सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल ५३२८ रुपये निश्चित करण्यात आला आहे. मात्र सध्या बाजारात सोयाबीनची खरेदी फक्त ३५०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल या दरात होत असल्याने शेतकरी अडचणीत आले होते. धाराशिव जिल्ह्यात यंदा साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पादन कमी असल्याने आणि दर कोसळल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार असल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यात सुमारे ३० खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून खरेदी केंद्रांची यादी आणि मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.









