आरंभ मराठी / धाराशिव
भूम परिसरात पेट्रोलिंग करताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. चौकशीत भूम पोलिस ठाण्यातील जबरी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला असून, दोन्ही आरोपी जिल्ह्यातील १० गुन्ह्यांमध्ये निष्पन्न आरोपी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. सुदर्शन कासार व त्यांचे पथक मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे तसेच पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भूम परिसरातून दोन संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे मिळून आली.
याप्रकरणी दोघांविरुद्ध विनापरवाना व बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४९५/२०२६, कलम ३, २५ आर्म्स अॅक्ट १९५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींकडे केलेल्या चौकशीत भूम पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रजि. नं. ४३९/२०२६, कलम ३०९ (४), ३३१ (४), ३ (५) बीएनएस अन्वये जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला. या गुन्ह्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, अंदाजे ४० हजार रुपये किमतीची, पोलिसांनी हस्तगत केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिल उर्फ शेंड्या आबा काळे (वय २४) आणि पवन उर्फ छगन महादेव काळे (वय २१), दोघे रा. खामकरवाडी, पारधी पिढी, ता. वाशी, जि. धाराशिव अशी आहेत. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि सोन्याची अंगठी असा एकूण सुमारे ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान दोन्ही आरोपी हे जिल्ह्यातील १० गुन्ह्यांतील निष्पन्न आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांच्या तपासालाही महत्त्वपूर्ण दिशा मिळण्याची शक्यता आहे.
दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना रिपोर्टसह भूम पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि. सुदर्शन कासार, पोहवा. शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण तसेच चापोहवा. नागनाथ गुख, रत्नदिप डोंगरे व आरसीपी पथक, धाराशिव यांनी केली.












