भव्य मिरवणूक; दिवसभर महाप्रसादाचे आयोजन
आरंभ मराठी धाराशिव
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांसाठी उद्या बुधवारी धाराशिवमध्ये भक्तीचा सोहळा रंगणार आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांनी धारण केलेल्या पवित्र पादुका आणि रुद्राक्ष माळेच्या दर्शनाची पर्वणी भाविकांना लाभणार आहे. बार्शी नाक्याजवळ नवीन स्वामी समर्थ नगर येथे या विशेष दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संत गाडगे महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, जिजाऊ चौकमार्गे बार्शी रोडवरून ही मिरवणूक स्वामी समर्थ नगर येथे पोहोचणार आहे. स्वामी समर्थांच्या जयघोषात निघणाऱ्या या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
स्वामी समर्थ नगर, तांबरी विभाग, लिंबोणी बाग येथील गणपती मंदिराजवळ दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पवित्र पादुका आणि रुद्राक्ष माळेचे दर्शन घेता येणार आहे. यावेळी दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगलमूर्ती बिल्डर अँड डेव्हलपर यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, स्वामी समर्थ नगर येथे स्वामी समर्थ महाराजांची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली असून परिसराचे आकर्षक सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सजविलेल्या परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.
जिल्ह्यासह परिसरातील स्वामी भक्तांनी कुटुंबीयांसह उपस्थित राहून पवित्र पादुका व रुद्राक्ष माळेचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.










