आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने खरीप पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. तसेच चारा डेपो, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने खरीप नुकसानीचे अनुदान मिळवून दिल्यानंतर लवकरात लवकर पीकविम्याची रक्कम मिळवून देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. धाराशिव तालुक्यातील उपळा शिवारात ग्रामस्थ व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत आयोजित घोंगडी बैठकीत आमदार पाटील बोलत होते.
यावेळी त्यांनी प्रत्यक्ष शिवारात जाऊन पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली. जिल्ह्यातील पिकांच्या गंभीर परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनासमोर मांडण्यासाठी प्रथमच विद्यापीठातील शास्त्रज्ञ, मुंबई येथील आयआयटीतील वरिष्ठ तज्ज्ञ तसेच महसूल व कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले आहेत. या पाहणीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड आणि संभाव्य नुकसान याबाबतची मुद्देनिहाय वस्तुनिष्ठ माहिती अहवालात नमूद करण्यात आली आहे.
आगामी पंचनामे व नुकसानभरपाई निश्चित करताना या तांत्रिक अहवालाचा मोठा उपयोग होणार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठीही ही माहिती महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ज्या भागात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे तातडीने टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाअभावी पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जनावरे वाचविण्यासाठी चारा डेपो सुरू करण्याची पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार त्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. दुष्काळामुळे शेतीवरील उत्पन्नाचा स्रोत अडचणीत आलेल्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्या हाताला काम मिळावे आणि चरितार्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीत पाणी, चारा, रोजगार आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याला प्राधान्य राहणार असल्याचे आमदार राणा पाटील यांनी स्पष्ट केले.






