आरंभ मराठी / धाराशिव
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित डॉ. बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयात वर्गात घुसून एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. ३०) घडली होती. या प्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कायला कृष्णा मूर्ती यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात इम्तियाज शेख व त्याच्यासोबत आलेल्या एका अनोळखी इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी महाविद्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरज काशिद हा विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत वर्गात बसला असताना इम्तियाज शेख व त्याच्यासोबत आलेले काहीजण वर्गात आले. त्यातील एकाने सुरज याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी त्याला वर्गाबाहेर काढून कॉलर पकडत जिन्यावरून ओढत खाली आणले. यावेळी त्याला अश्लील शिवीगाळही करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, प्रबुद्ध गायकवाड या विद्यार्थ्याने तसेच महाविद्यालयाचे शिपाई बशीर अत्तार यांनी मध्यस्थी करून सुरजची मारहाणीतून सुटका केली. मात्र, मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी सुरज व प्रबुद्ध यांचे मोबाईलमध्ये फोटो काढून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. महाविद्यालयाच्या आवारात शांततेचा भंग करून विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी प्राचार्य डॉ. कायला कृष्णा मूर्ती यांनी १ ऑक्टोबर रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली.
त्यावरून पोलिसांनी इम्तियाज शेख व त्याच्या साथीदाराविरुद्ध BNS २०२३ मधील कलम ११५(२), १९४(२), ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये FIR क्र. ०३९९/२०२६ दाखल केला आहे.
मारहाण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाविद्यालयाने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी दिवसभर आंदोलन केले. त्यामुळे महाविद्यालय परिसरात दिवसभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने दोन तरुणांविरुद्ध छेडछाडीची तक्रार दिल्याने स्वतंत्र गुन्हा दाखल झाला आहे.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याने विधी महाविद्यालयातील वातावरण अधिकच तापले आहे.











