आम्ही ठाकरेंचे शिलेदार, काल, आज आणि उद्याही ठाकरेंसोबतच
–
बंडाच्या जाळ्यातून बाहेर पडलेल्या आमदांराचे स्पष्टीकरण
आरंभ मराठी / धाराशिव
मागील दोन दिवसांपासून खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे दोघे उध्दव ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार, अशा चर्चा सुरू आहेत.माध्यमातून येणाऱ्या बातम्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खतपाणी घातले. माध्यमातून या बातम्यांना पुन्हा जोर आला.
पण ठाकरेंचे शिलेदार आमदार कैलास पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम देताना आम्ही काल,आज आणि उद्याही ठाकरेंच्या सोबतच असू, अशा चर्चा अर्थहीन आहेत,असे स्पष्ट केले. आमदार कैलास पाटील हे शिवसेना फुटीच्या वेळी बंडाच्या जाळ्यातून शिताफीने बाहेर पडले होते. त्यामुळे निष्ठावान असलेल्या कैलास पाटील यांना ठाकरे परिवारात वेगळं स्थान आहे.
का सुरू झाली चर्चा ?
गेल्या आठवड्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंची उरलेली शिवसेना फुटणार असल्याचे जाहीर केले होते.प्रजासत्ताक दिनानिमित्त नूतन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांचा जिल्हा दौरा केला.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यात हसत खेळत सहज संवाद होत होता. हे दोन्ही नेते दोन वेगळ्या शिवसेनेचे आहेत असे वाटत नव्हते.
त्यातच पालकमंत्री सरनाईक यांनी बोलता बोलता ओमराजे हे महायुतीचेच नेते आहेत, असे विधान केले होते. बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी लवकरच राजकीय भूकंप होईल असेही विधान केले होते. त्यामुळे कालपासून खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशा बातम्या येत आहेत.
आमदार कैलास पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देताना आम्ही कालही उद्धव ठाकरेंसोबत होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार असे वक्तव्य करून या चर्चांना पूर्णविराम दिला. खासदार ओमराजे यांनीही पक्षांतराच्या चर्चा या निराधार असल्याचे जाहीर केले असून, विरोधात बसून संघर्ष करू पण उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. कैलास पाटील यांनी सोशल मीडियावर देखील उद्धव ठाकरेंसोबत ओमराजे आणि कैलास पाटील उभे असलेला फोटो पोस्ट करून पक्षबदलाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कसलाही राजकीय भूकंप होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.