आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूरहून सोलापूरकडे चाललेली लक्झरी बस तुळजापूर येथील घाटात पलटी झाली असून, बसमधील जवळपास पन्नास प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदी येथील भाविक लक्झरी बसने तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते.
या बसमध्ये ५५ प्रवासी होते. तुळजापूरला दर्शन घेऊन परत जाताना घाटातील पहिल्या वळणावर बस (MH 12 PQ 0666) ही लक्झरी बस पलटी झाली. नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत प्रवाशांना बाहेर काढले. सुदैवाने ही बस कठड्यावर पलटी झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, खाली जवळपास तीनशे ते चारशे फूट खोल दरी आहे.
सर्व जखमींना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात मोठा असल्यामुळे सर्व प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत आरडाओरडा करत होते.
रोडवरील इतर प्रवाशांनी आणि स्थानिकांनी तात्काळ मदत केल्यामुळे जखमींना उपचारासाठी दाखल करण्यास वेळ लागला नाही. घटनास्थळी पोलिसांनीही धाव घेतली.