आरंभ मराठी / धाराशिव
सकल मराठा समाजाच्या तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आक्रमक पवित्रा घेतला असून, या तरुणांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच स्वतःला कोंडून घेतले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी या गावात मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी सातवे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस असून, जरांगे यांची तब्येत खालावत चालली आहे.
त्यामुळे धाराशिव येथील सात तरुणांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा दंडाधिकारी यांच्या न्यायालयीन कक्षात सात तरुणांनी स्वतःला कोंडून घेतले आहे.
त्यामुळे पोलीस प्रशासनाची आणि जिल्हा प्रशासनाचीही गोची झाली आहे. जिल्हाधिकारी स्वतः आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी बाहेर उभे असताना हे तरुण मात्र दरवाजा उघडायला तयार नाहीत.
पोलिसांचा मोठा फौजफाटा जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आला असून, तरुणांना दरवाजा उघडून चर्चा करण्याची विनंती करण्यात येत आहे. या तरुणांनी आतमधूनच एक व्हिडिओ काढून प्रसारित केला आहे.
यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार आणि प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे आंदोलन करावे लागत असल्याचे तरुणांनी सांगितले.