चैतन्यमय पंढरी, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाविकाकडून सजावट
आरंभ मराठी / पंढरपूर/ पुरंदर
सबंध वारकऱ्यांचं दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात नववर्षानिमित्त विविध फुलांची, फळांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, मंदिर गाभारा आणि आतील परिसर सुशोभित करण्यात आला आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असून, अवघी पंढरी चैतन्यमय झाली आहे.
पुण्यातील भक्ताकडून मोफत सजावट
मंदिर व्यवस्थापक मनोज श्रोत्री म्हणाले, श्री विठ्ठल गाभारा, श्री रुक्मिणी गाभारा व श्री संत नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, तोरण, कामिनी इत्यादी 300 किलो फुलांनी व 5 हजार संत्रा फळांनी मनमोहक व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुण्यातील विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकुर यांनी मोफत केली असून, सजावटीचे काम श्री साई डेकोरेटर्स शिंदे ब्रदर्स (पंढरपूर) यांनी केले आहे.
20 कामगारांनी बजावली सेवा
त्यासाठी सुमारे 20 कामगारांनी परिश्रम घेतले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सेवा करण्याबाबत आळंदी (जि.पुणे) येथील प्रदिपसिंह ठाकुर परिवाराने मंदिर समितीकडे 2021 मध्ये इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून म्हणजे मागील पाच वर्षापासून नववर्षी निमित्त मंदिरात सेवाभाव म्हणून फुलांची आरास करून देत आहेत.
गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना
नववर्षानिमित्त भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, भाविकांची गर्दी विचारात घेऊन भाविकांचे जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने ऑनलाइन दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तसेच व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पुजेची संख्या कमी करणे व इतर अनुषंगिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
मंदीर परिसर गजबजला
महत्त्वाचे सण उत्सव, खास दिवस या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, सजावट केली जाते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले असून, मंदिरात आकर्षक फळा-फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याने, विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे. नवीन वर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी,यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरात दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगेत गर्दी केली असून, विठ्ठल रुक्मिणीमातेच्या नाम गजराने परिसर दुमदुमून गेला आहे.