वनविभागाकडून ६ लाख रुपयांची नुकसान भरपाई
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव – वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या पाळीव जनावरांना आणि जखमी किंवा मृत झालेल्या शेतकऱ्यांना वन विभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नोंद वनविभाग ठेवते.
वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर २०२४ या एक वर्षात धाराशिव जिल्ह्यातील एकूण २० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. तर दोन शेतकऱ्यांवर देखील वन्य प्राण्याने हल्ले केले आहेत. त्यामुळे वनविभागाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून एक वर्षात ६ लाख रुपयांची मदत मिळाली आहे. शेतीपिकांच्या नुकसानीचीही मदत यात घेतली तर वनविभागाने या एक वर्षात ९ लाख ६१ हजार ७०० रुपयांची नुकसान भरपाई वितरित केली आहे. काही प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे हा आकडा वाढू शकतो.
दोन महिन्यापासून जिल्ह्यात वाघ आणि बिबट्याचा संचार
मागील तीन महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यात बिबट्याने हैदोस घातला आहे. दोन आठवड्यापूर्वी रामलिंग अभयारण्य परिसरात बिबट्यासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ दिसून आल्यामुळे वनविभागासह सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑक्टोबर महिन्यापासून परंडा आणि भूम तालुक्यात बिबट्याचा संचार सुरू आहे. मागील तीन वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यात नोव्हेंबर – डिसेंबर महिन्याच्या आसपास बिबट्या संचार करत आहे.
भूम आणि परंडा तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात पाळीव जनावरांवर प्राणघातक हल्ले करून बिबट्याने जनावरांचा फडशा पाडला होता. यामध्ये गाय, म्हैस, शेळी यांचा समावेश होता. वनविभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार २०२४ या एका वर्षात धाराशिव जिल्ह्यातील एकूण २० पाळीव जनावरांच्या शेतकऱ्यांना ३ लाख ५४ हजार २५० रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर, भूम आणि उमरगा असे तीन वन परिक्षेत्र आहेत. यापैकी सर्वाधिक नुकसान भरपाई भूम परिक्षेत्रात दिली आहे. भूम परिक्षेत्रात १८ जनावरांना २ लाख १२ हजार ४०० रुपये भरपाई दिली आहे. तुळजापूर मध्ये एका जनावरासाठी ११ हजार ५०० तर उमरगा येथे एका जनावरासाठी ५६ हजार नुकसान भरपाई दिली आहे. वनविभागाने जरी फक्त २० जनावरांनाच नुकसान भरपाई दिली असली तरी यावर्षी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जवळपास ३० जनावरे दगावली असण्याची शक्यता आहे. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत वाघ व बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या किंवा मृत झालेल्या जनावरांना वन विभागाकडून मदत दिली जाते.
त्या प्राण्यांच्या मालकांना वनविभागाकडून ६ लाखांची मदत देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून भूम, परंडा, कळंब आणि तुळजापूर या चार तालुक्यात बिबट्याचा संचार वाढलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात एकाच वेळी दोनपेक्षा अधिक बिबटे असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. त्यातच टिपेश्वर मधून आलेला वाघ देखील इथेच असून गेल्या काही दिवसात वाघाने देखील पाळीव जनावरांचा फडशा पाडलेला आहे.
अशी मिळते मदत –
वन्य प्राण्याने पाळीव जनावरावर हल्ला करून त्याला जीवे मारले किंवा जखमी केले तर वनविभागाच्या पथकाकडून पंचनामा केला जातो. जनावराच्या मालकाकडून आधार कार्ड, बँक पासबुक आणि इतर कागदपत्रे घेऊन ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज भरून घेतला जातो. शासनाच्या जीआर प्रमाणे जखमी झालेल्या किंवा मृत झालेल्या जनावराची किंमत काढली जाते. आणि ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात थेट जमा केली जाते.
हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास मिळतात २५ लाख रुपये –
वाघ, बिबट्या, तरस, रानडुक्कर किंवा इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जर एखादा शेतकरी मृत्युमुखी पडला तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना वनविभागाकडून २५ लाख रुपयांची मदत दिली जाते. जर शेतकरी जखमी झाला तर तर त्याची जखम किती गंभीर आहे, अवयव निकामी झालेला आहे का? हे पाहून सरकारी निकषानुसार नुकसान भरपाई दिली जाते. धाराशिव जिल्ह्यात २०२४ मध्ये तुळजापूर परीक्षेत्रातील एका शेतकऱ्याला ८५ हजार रुपये तर उमरगा परीक्षेत्रातील एका शेतकऱ्याला ५१ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. मागील महिन्यात मात्रेवाडी येथील शेतकऱ्यावर वन्य प्राण्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्या शेतकऱ्याला मदत मिळण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. सुदैवाने या वर्षात धाराशिव जिल्ह्यातील एकही शेतकरी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला नाही.
एक महिन्यात मिळते मदत –
एरव्ही सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हटले जाते. परंतु वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या जीवित हानीची नुकसान भरपाई मात्र एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना थेट खात्यावर वितरित केली जाते. मनुष्यावर झालेल्या हल्ल्यात मेडिकल रिपोर्ट आणि इतर कागदपत्रांसाठी कालावधी थोडा जास्त लागतो. परंतु पाळीव जनावरांची मदत एक महिन्यात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाते.
शेतीपिकांच्या नुकसानीबद्दल एक वर्षात साडेतीन लाख रुपयांची नुकसान भरपाई –
हरीण, रानडुक्कर आणि इतर वन्य प्राणी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. ऊस, भुईमूग, फळबाग यांचे नुकसान सर्वाधिक केले जाते. या नुकसानी बद्दल वनविभागाच्या वतीने २०२४ मध्ये ३ लाख ५४ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत.
नुकसान झाल्यास तात्काळ मदतीचे प्रयत्न –
वन्य प्राण्यांकडून पाळीव जनावरांचे किंवा शेतीपिकांचे काही नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाते. वन विभागाला तक्रार प्राप्त होताच पंचनामा करून आवश्यक ती कागदपत्रे जमा करून थेट खात्यावर मदत देण्यात येते.
बी. ए. पौळ
विभागीय वन अधिकारी.
चार्ट – १
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेली नुकसान भरपाई –
वन परिक्षेत्र – जनावरांची संख्या – दिलेली नुकसान भरपाई
तुळजापूर – १ – ११५००
भूम – १८ – ४०३९५०
उमरगा – १ – ५६०००
एकूण – २० – ४७१४५०
चार्ट – २
पिकांची नुकसान भरपाई
वन परिक्षेत्र – प्रकरणांची संख्या – नुकसान भरपाई
तुळजापूर – १७ – १४१८५०
भूम – २३ – २१२४००
उमरगा – ०० – ००
एकूण – ४० – ३५४२५०