पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
आरंभ मराठी / पुणे
केज तालुक्यातील मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड अखेर पुणे येथील पाषाण रोडच्या सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला आहे. त्याने स्वतः व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये जारी करून आपण शरण येत असल्याचे जाहीर केले आणि काही क्षणात तो सी आय डी पुणे कार्यालयात हजर झाला. दरम्यान, एका वृत्त वाहिनीने दिलेल्या हवाल्यानुसार कराड याच्यावर पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात उपचार सुरू होते.
त्याचे मोबाईल लोकेशन देखील पुण्यातील दाखवत होते. तरीही तो पोलिसाना सापडला नाही,त्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर तीन आठवड्यानी वाल्मिक कराड शरण आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड शरण येईल असे बोलले जात होते. या प्रकरणाचा छडा लावण्याचा दृष्टीने कराड हा हाती लागणे आवश्यक होते.
पोलीसांनी कराड याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी शनिवारी (दि.२८) बीड येथे सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचा आरोप सुरुवातीपासून होत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात
सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे हे प्रमुख आरोपी आहेत. यातील काही आरोपींना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले आहे तर खंडणी प्रकरणात वाल्मिकी कराडसह अन्य आरोपी फरार होते.
विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड खडाजंगी झाली होती. वाल्मिक कराड याने माझ्यावर दाखल झालेला खंडणीचा गुन्हा खोटा असून, मला फसवले गेले असल्याचा आरोप केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, असेही वाल्मिक कराड याने शरण जाताना प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.