आरंभ मराठी / धाराशिव
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासनासाठी राज्य शासनाने स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी पद निर्माण केले असून या पदावर उपेंद्र गोविंद तामोरे यांनी मंगळवारी ( २ जून) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
सन २००२ बॅचचे उपजिल्हाधिकारी असलेल्या तामोरे यांना महसूल, नियोजन आणि प्रशासकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. या नियुक्तीपूर्वी ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंधेरी येथील कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर संस्थानच्या प्रशासनाला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. विकास आराखड्यांतर्गत प्रस्तावित विविध कामांचे नियोजन, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तामोरे यांचा अनुभव उपयुक्त ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रशासकीय सेवेत विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी सुशासन, पारदर्शकता आणि विकासाभिमुख नियोजनाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मंदिर प्रशासन, भाविकांना उपलब्ध होणाऱ्या सुविधा, विकासकामे आणि व्यवस्थापन अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तसेच तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला गती मिळून तुळजापूरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








