प्रकरण पवनचक्कीच्या लोकांवर ढकलण्याचा प्रयत्न उघड
–
मेसाई जवळगा येथील प्रकरणात खळबळजनक माहिती समोर
आरंभ मराठी / धाराशिव
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंचाने स्वतःला बंदुकीचे लायसन मिळण्यासाठी पवनचक्कीच्या गुंडांकडून आपल्या गाडीवर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात म्हणजे 26 डिसेंबर रोजी रात्री 10 वजेच्या सुमारास मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम आणि त्यांचे मित्र प्रवीण इंगळे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर सरपंचाने आणि त्यांच्या मित्राने स्वतःच हा बनाव केला असल्याचे उघड झाले आहे.
मस्साजोग प्रकरणानंतर राज्यात पवनचक्कीच्या गुंडांकडून गावकऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे या संदर्भात राज्य शासन आणि पोलिस दल अलर्ट झाले आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथे पवनचक्कीचे काम सुरू आहे.
काही दिवसांपासून पवनचक्कीच्या लोकांकडून शेतकऱ्यांना दमदाटी केला जात असल्याचा आरोप होत आहे. पवनचक्कीच्या गुंडांकडून स्कार्पिओ कार मध्ये बाऊन्सर्स आणून शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर 26 डिसेंबर रोजी मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम हे त्यांच्या कारमधून मित्रासमवेत पुण्यावरून गावी येत असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीच्या काचा फोडून अज्ञात लोकांनी पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारची तक्रार त्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनला दिली होती.
त्यानुसार अज्ञात लोकांवर गुन्हाही दाखल झाला होता, मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर निकम आणि इंगळे या दोघांनी मिळून हा बनाव रचल्याचे उघड झाले असून वास्तविक पाहता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा हल्ला झाला नसून निकम यांना बंदुकीचे लायसन मिळण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
त्यामुळे पवनचक्कीच्या लोकांवर खापर फोडण्याचा हा प्रकार संताप जनक असल्याचे बोलले जात आहे.