आरंभ मराठी / धाराशिव
नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आमदार राणा पाटील यांच्यासमोर आक्रोश करत शक्तीपीठ रद्द करण्याची एकमुखी मागणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील १९ गावातील बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आमदार पाटील यांनी रविवारी (दि.२९) बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत १९ गावातील ५० ते ७० बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली. धाराशिव जिल्ह्यातील 468 हेक्टर जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. तर जिल्ह्यातून जाणारे शक्तीपीठ महामार्गाचे अंतर 46 किलोमीटर आहे.
यावेळी आमदार राणा पाटील यांनी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आपापल्या भागातील जमिनीचे भाव किती आहेत ही माहिती काढण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
याला शेतकऱ्यांनी आक्षेप घेत पैसे नको जमीनच हवी अशी भूमिका मांडली. यावेळी आमदार राणा पाटील यांनी या महामार्गावर प्रत्येक 100 किलोमीटरला 1000 शेततळी करण्यात येणार असून, रस्त्याचे काम सुरू असताना या शेततळ्याचे निम्मे पाणी शेतकऱ्यांना वापरता येणार असल्याचे सांगितले.
तर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ते शेततळे शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार पाटील यांनी भूसंपादन करताना सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव आणि तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांची उपस्थिती होती.
कुठल्याही ठोस निर्णयाशिवाय ही बैठक समाप्त करण्यात आली. उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात धाराशिव जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी भूमिका आपण मांडावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी पाटील यांच्याकडे केली त्याला त्यांनी नकार दिला. बैठकीत कुठलाच ठोस निर्णय न झाल्याने बाधित शेतकऱ्यांनी विरोध सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.