आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. विविध विभागांकडून आवश्यक माहिती शासनास वेळोवेळी सादर करावी लागत असल्याने धाराशिव जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व कार्यालये तसेच अधिनिस्त कार्यालये २, ३ व ४ ऑक्टोबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही नियमितपणे सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी १ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या आढावा बैठकीत याबाबत सूचना दिल्या. सध्या राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा विविध पातळ्यांवर आढावा घेण्यात येत आहे. या परिस्थितीशी संबंधित माहिती शासनास वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याने कार्यालयीन कामकाजात खंड पडू नये, यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत सर्व विभाग प्रमुख व खाते प्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांना कार्यालये नियमितपणे सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिनिस्त कार्यालयांनीही या कालावधीत नियमितपणे कामकाज सुरू ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त, तसेच ३ व ४ ऑक्टोबर रोजी असलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीतही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीशी निगडित आवश्यक कामकाज, माहिती संकलन व शासनास सादर करावयाच्या अहवालांची कार्यवाही सुरू ठेवणे अपेक्षित आहे.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तुकाराम भालके यांनी १ ऑक्टोबर रोजी याबाबतचे निर्देश सर्व संबंधित विभाग प्रमुख, खाते प्रमुख आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे सलग तीन दिवसांच्या सार्वजनिक सुट्टीच्या काळातही जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील संबंधित कार्यालयांचे कामकाज सुरू राहणार आहे.










