आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
आरंभ मराठी / धाराशिव
दुष्काळामुळे सोयाबीनला शेंगाच न आल्याने झालेला मोठा आर्थिक फटका आणि कर्जफेडीची चिंता असह्य झाल्याने धाराशिव तालुक्यातील खानापूर येथील ३५ वर्षीय शेतकरी दयानंद राठोड यांनी गुरुवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे.
राठोड गुरुवारी नातेवाईकांसह शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेले होते. मात्र, दुष्काळामुळे सोयाबीनला अपेक्षित फळधारणाच झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यंदाही मोठा तोटा सहन करावा लागणार असल्याच्या चिंतेत ते घरी परतले. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शुक्रवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबावर कर्जाचा डोंगर असताना आता मुलाबाळांचा सांभाळ कसा करायचा, या चिंतेने नातेवाईकांनी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. कुटुंबाला तातडीने मदत मिळावी आणि प्रशासनाने या प्रकरणात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सुमारे तीन तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता.
दरम्यान, आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत राठोड यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी या प्रकरणाबाबत चर्चा केली.
दुष्काळामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक भागांत सोयाबीनसह अन्य पिकांची अवस्था बिकट आहे. पिके हातातून गेल्यानंतर कर्जफेड, जनावरांचा सांभाळ आणि रोजगाराचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे राठोड यांच्या आत्महत्येने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोरील गंभीर परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.










