आरंभ मराठी / धाराशिव
नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या प्रश्नावर गेल्या तीन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात राडा सुरू आहे. बाधित शेतकऱ्यांनी एकजुटीने केलेल्या विरोधामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज धाराशिव जिल्ह्यात मोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोर्चा काढला.
यावेळी चारशे ते पाचशे शेतकऱ्यांचा जमाव जमला होता. यावेळी राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सवाल केले. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न केले ज्याची उत्तरे त्यांना देता आली नाहीत. या बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थित राहिले नाहीत.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांना राजू शेट्टी यांनी फैलावर घेत सवाल केले. पोलिसांची मदत घेऊन शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला तर गाठ शेतकऱ्यांशी आहे असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला. यावेळी प्रशासनाकडून मोजणी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
धाराशिव जिल्ह्यातील १९ गावात मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. १, २, ७, १४ आणि २१ जुलै रोजी होणारी मोजणी प्रक्रिया प्रशासनाने रद्द केली असल्याचे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे. मंगळवारी एमएसआरडीसी चे पथक धाराशिव जिल्ह्यात येणार असून, या पथकाकडून बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.
तोपर्यंत शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.