आरंभ मराठी / धाराशिव
लातूर-बीड-धाराशिव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य तसेच अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीचे सचिव महेश माणिकराव देशमुख यांना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे.
या मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आली असून, उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असताना अचानक महेश देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काँग्रेस पक्षाकडून उमेदवार निवडीचे अधिकार माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आले होते. उमेदवार निवडीसह निवडणुकीची संपूर्ण रणनीती आखण्यात अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या अंतिम दिवस असल्याने भाजपकडून आजच उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मतदारसंघातील संख्याबळाचा विचार करता महायुतीची स्थिती मजबूत मानली जाते. भाजपकडे सर्वाधिक सदस्यसंख्या असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर विजयाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महेश देशमुख यांना निवडणुकीत यश मिळवण्यासाठी पक्षीय संख्याबळाबरोबरच क्रॉस व्होटिंग आणि प्रभावी राजकीय रणनीतीची आवश्यकता भासणार आहे.
महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केल्यामुळे आता सर्वांचे लक्ष महायुतीच्या उमेदवाराकडे लागले असून, आगामी काही दिवसांत या निवडणुकीची राजकीय रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे.








