पालिकेची झोळी रिकामी, मुख्याधिकारी सुटीवर, 6 कोटी थकल्याने स्वच्छता करणाऱ्या कंपनीने गाशा गुंडाळला
धाराशिव शहरात स्वच्छतेचा बोजवारा
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरात मागील चार दिवसांपासून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिकेची तिजोरी रिकामी झाल्यामुळे कंपनीचे थकीत बील काढण्यासाठी पैसेच नसल्याने स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीने चार दिवसांपासून काम बंद केले आहे.
त्यामुळे शहरात सर्वत्र स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, अवकाळी पावसामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. कंपनीचे जवळपास सहा कोटींचे बील थकल्यामुळे कंत्राट घेतलेल्या कंपनीने बील द्या अन्यथा काम बंद अशी भूमिका घेतल्यामुळे शहरातील गल्लोगल्ली कचऱ्याचे अक्षरशः ढीग साचले आहेत.
त्यातच मुख्याधिकारी सुट्टीवर असल्यामुळे हा प्रश्न कधी सुटणार ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.एरव्ही न झालेल्या विकासाचे फ्लेक्स लावून श्रेय घेणाऱ्या राजकीय मंडळींनी शहराला कचऱ्यात ढकलल्याचे श्रेय मात्र घेतलेले दिसत नाही.
धाराशिव शहरात स्वच्छतेचा प्रश्न बाराही महिने गंभीर असतो. कोट्यवधी रुपयांचे टेंडर देऊनही शहरातील कचऱ्याची समस्या मिटलेली नाही. त्यातच गेल्या चार दिवसांपासून स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीने पालिकेने वेळेत बील न दिल्यामुळे स्वच्छतेचे काम करण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, अवकाळी पावसामुळे या घाणीचे रूपांतर रोगराईत होण्याची शक्यता आहे. मागील चार दिवसात शहरातील प्रमुख चौक वगळता एकाही प्रभागातील कचरा उचलला गेला नाही.
तसेच शहरातून घंटागाडी फिरत नसल्यामुळे घरातील कचरा नेमका कुठे टाकावा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यातच अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे गल्ली-बोळात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
कंपनीचे साडेसहा कोटी रुपये थकले –
धाराशिव नगर पालिकेने शहर स्वच्छतेसाठी २९ जानेवारी २०२४ रोजी एन डी के हॉस्पिटॅलिटी, एल एल पी, (फलटण) या कंपनीला शहरातील स्वच्छतेचे कंत्राट दिले आहे. कंपनीसोबत केलेल्या करारानुसार वार्षिक ८ कोटी ७९ लाख रुपयांचा खर्च फक्त स्वच्छतेसाठी केला जाणार होता. हा खर्च महिन्याला ७३ लाख २५ हजार रुपये तर दिवसाला तब्बल २ लाख ४४ हजार रुपये आहे.
कंपनीसोबत झालेल्या करारानुसार स्वच्छतेसाठी सर्व वार्डमध्ये मिळून दररोज २४० कर्मचारी काम करतील असे म्हटले आहे. तसेच कचरा उचलण्यासाठी नगर पालिकेच्या मालकीच्या २० घंटागाडी आणि कंपनीच्या मालकीच्या १० घंटागाडी अशा एकूण ३० घंटागाडी दररोज कचरा उचलण्यासाठी शहरातील सर्व भागात फिरून कचरा गोळा करतील असेही या करारात म्हटलेले आहे.
हा करार करून १६ महिने झाले तरी पालिकेने कंपनीला फक्त अडीच महिन्यांचे जवळपास दोन कोटी रुपये दिले आहेत.तर साडेसहा कोटी रुपये थकीत आहेत. या थकीत पैशांसाठी कंपनीने स्वच्छतेचे काम बंद केले आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रमुख चौकातील स्वच्छता –
सध्या कंपनीने काम सोडल्यामुळे पालिकेचे १६ कर्मचारी आणि इतर १४ कर्मचारी अशा एकूण ३० कर्मचाऱ्यांकडून प्रमुख चौकातील स्वच्छतेचे काम केले जात आहे. पालिकेच्या तीन ट्रॅक्टरमधून काही प्रमाणात कचरा उचलला जात आहे. परंतु प्रभागातील कचरा मात्र चार दिवसांपासून तसाच आहे. काही नागरिकांनी हा कचरा दारातच टाकल्यामुळे काही भागात दुर्गंधी पसरली आहे.
पालिकेला आर्थिक ताळमेळ जमेना –
पालिकेचा आर्थिक ताळमेळ जमत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. पथदिव्यांच्या बाबतीत देखील कोट्यवधींचे बील थकल्यामुळे कंपनीने काम सोडले होते.आता स्वच्छतेचे तेच झाले आहे. पालिकेला वर्षाला मालमत्ता कर ८ कोटी आणि पाणीपट्टी २ कोटी असे १० कोटी येणे असतात. त्यातील ८ कोटी रुपये प्रत्यक्ष मिळतात. तर पालिकेचे वर्षाचे लाईट बील १२ कोटी आहे. म्हणजे आलेल्या पैशातून लाईट बील देखील निघत नाही, मग इतर प्रश्न कसे सुटणार ?
मुख्याधिकारी रजेवर –
शहरात स्वच्छतेचा असा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना मुख्याधिकारी मात्र रजेवर गेल्याचे समजते. त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. स्वच्छता निरीक्षक म्हणून नवीनच रुजू झालेल्या व्यक्तीला यातील काहीच माहिती नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पेमेंट थकल्यामुळे कंपनीचे काम बंद –
मी नवीनच चार्ज घेतला आहे. त्यामुळे मला या विषयाची अधिक माहिती नाही. फक्त पेमेंट थकल्यामुळे कंपनीने काम बंद केलेले आहे. मुख्याधिकारी यांना हा विषय कळवला आहे. या प्रश्नावर त्याच योग्य निर्णय घेतील.
गणेश मेहर,
स्वच्छता निरीक्षक,
नगरपालिका, धाराशिव.