आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव पंचायत समिती ते समतानगर दरम्यान जाणारा प्रमुख रस्ता पुन्हा एकदा बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने या रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शुक्रवारी (दि.१८) रातोरात पंचायत समितीच्या एका गेटजवळ विटांची भिंत उभारून रस्ता बंद करण्याचे काम सुरू करण्यात आले.
याची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा कार्यकर्ते रातोरात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरू असलेले बांधकाम बंद पाडले. मागील सहा महिन्यांत पंचायत समिती ते समतानगरदरम्यान असलेला हा प्रमुख रस्ता बंद करण्याचा तीन वेळा प्रयत्न झाला आहे. पहिल्यांदा या रस्त्यावर तारेचे कुंपण घालून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या भंगार वाहनांचा वापर करून रस्ता बंद करण्यात आला होता.
मात्र, प्रत्येक वेळी शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत हा रस्ता खुला केला. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेतून जाणारा हा रस्ता बंद करण्यात येणार असल्याचे यापूर्वी उघडपणे सांगितले होते. नवीन जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम तसेच कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारण्यासाठी ही जागा खुली करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे या रस्त्याच्या भवितव्याबाबत आधीपासूनच चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, धाराशिव नगरपालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या ५९ रस्त्यांमध्ये या रस्त्याचाही समावेश आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डरदेखील काढण्यात आली होती. मागील दोन महिन्यांपासून या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू होती.
मात्र, शुक्रवारी अचानक रातोरात रस्ता बंद करण्यासाठी विटांचे बांधकाम सुरू करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली. रस्ता बंद करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वतीने रातोरात वर्क ऑर्डर काढण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या वर्क ऑर्डरवर दिनांक तसेच जावक क्रमांक नसल्याचा आरोप शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
या वर्क ऑर्डरनुसार सुमारे अडीच लाख रुपयांचे काम एका ठेकेदाराला देण्यात आल्याचेही समोर आले आहे.
वर्क ऑर्डरच्या वैधतेसह रातोरात काम सुरू करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. या प्रकाराची माहिती मिळताच कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सुरू असलेल्या बांधकामाला विरोध केला. यावेळी झालेल्या गोंधळानंतर विटांची भिंत उभारण्याचे काम बंद करण्यात आले. पंचायत समिती ते समतानगर हा मार्ग नागरिकांसाठी महत्त्वाचा असून तो बंद केल्यास परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी तीन वेळा रस्ता बंद करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आता चौथ्यांदा रातोरात बांधकाम करण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रश्नावरून पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे.
विशेष म्हणजे दोन्ही शिवसेना गटांचा या रस्ता बंद करण्याच्या कामाला विरोध असल्याने पंचायत समितीचा हा रस्ता आता राजकीय वादाचे केंद्र बनला आहे.










