आरंभ मराठी / तुळजापूर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील मंदिरात आज (दि.११) पारंपरिक धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि सौमेय्याश्री पुजार यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेच्या धार्मिक विधीने नवरात्रोत्सवाचा शुभारंभ होताच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
आई तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदुमून गेली.
घटस्थापनेच्या कार्यक्रमाला महंत तुकोजी बुवा, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष विनोद गंगणे, अर्चनाताई गंगणे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन माया माने, नगरसेविका प्रियंकाताई गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते. शारदीय नवरात्र महोत्सव हा तुळजापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो.
आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी या काळात महाराष्ट्राच्या विविध भागांतून तसेच परराज्यांतून लाखो भाविक तुळजापुरात येतात. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या या उत्सवाला भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने तुळजापूर शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेच्या विधीने नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ झाला असून, आगामी नऊ दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा आणि पारंपरिक विधी पार पडणार आहेत.
या उत्सवाच्या माध्यमातून तुळजाभवानी मातेच्या प्राचीन धार्मिक परंपरेला उजाळा मिळणार आहे. नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन आणि मंदिर संस्थानकडून दर्शनव्यवस्था व आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना सुलभतेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने देवीचे दर्शन घेता यावे, यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
घटस्थापनेच्या कार्यक्रमाला तिन्ही पुजारी मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी, मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आई तुळजाभवानी मातेच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने तुळजापूर नगरीत शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह अनुभवायला मिळत आहे.









