आरंभ मराठी / धाराशिव
मृत्यूनंतरही आपले शरीर समाजाच्या आणि भावी पिढीच्या उपयोगी पडावे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला हातभार लागावा, या उदात्त विचारातून राजेगाव येथील ६७ वर्षीय शुभोदिनी शाहूराज पाटील यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांच्या इच्छेचा सन्मान करत पार्थिव शरीर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथील शरीररचनाशास्त्र विभागाकडे सुपूर्द केले.
मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान देण्याच्या त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. दरम्यान, या महाविद्यालयात बारावे देहदान झाले आहे.
शुभोदिनी शाहूराज पाटील (वय ६७, रा. राजेगाव, ता. जि. धाराशिव) यांना मागील काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या आजारामुळे श्वसनाचा त्रास होत होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. निधनानंतर त्यांच्या पूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार कुटुंबीयांनी त्यांचे पार्थिव देहदानासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केले. याबाबत शरीररचनाशास्त्र विभागाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी देहदान प्रमाणपत्र प्रदान केले.
शुभोदिनी पाटील यांनी मृत्यूनंतर आपले शरीर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनासाठी दान करण्याची इच्छा यापूर्वीच व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी देहदान इच्छापत्रही तयार करून ठेवले होते. आपल्या निधनानंतर पार्थिव शरीर वैद्यकीय शिक्षणासाठी दान करावे, अशी इच्छा त्यांनी नातेवाइकांना स्पष्टपणे सांगितली होती.
त्यांच्या या इच्छेचा सन्मान करत मुलगा रणजीत शाहूराज पाटील, मुलगी सौ. सारिका नितीन बागल, मुलगा अभिजित शाहूराज पाटील, जावई आणि नातवंडांनी एकत्रितपणे पुढाकार घेत पार्थिव शरीर वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाकडे सुपूर्द केले. वैद्यकीय महाविद्यालयाकडे करण्यात आलेले हे १२ वे देहदान आहे. या देहदानाचा उपयोग प्रथम वर्ष एमबीबीएस तसेच एमडी शरीररचनाशास्त्रच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आणि वैद्यकीय संशोधनासाठी करण्यात येणार आहे. मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी देहदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष शरीररचनेचे ज्ञान मिळण्यास अशा देहदानामुळे मदत होते. भविष्यात कुशल डॉक्टर घडविण्याच्या प्रक्रियेत हे योगदान मोलाचे ठरणार आहे.











