आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील येडशी येथे दिनांक ९ नोव्हेंबर रोजी घर व दुकानाला लागलेल्या भीषण आगीत करंडे कुटुंबातील सहा सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक दुर्घटनेतील पीडित करंडे कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ९ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.
तसेच शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून ५ लाख रुपयांची स्वतंत्र आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
येडशी येथील करंडे कुटुंबाच्या घराला व दुकानांना लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
या दुर्घटनेत कुटुंबाचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये, तसेच आगीत नुकसान झालेल्या किराणा दुकान, गिफ्ट वेअर दुकान आणि राहत्या घरासाठी प्रत्येकी एक लाख रुपये, अशी एकूण ९ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. मंजूर मदतीचा निधी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
याशिवाय शिवसेनेच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून करंडे कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची स्वतंत्र आर्थिक मदत देण्यात येत आहे.
या दुर्घटनेत गमावलेल्या आप्तस्वकीयांची उणीव कोणत्याही आर्थिक मदतीने भरून निघणार नाही. मात्र, या संकटातून सावरण्यासाठी आणि कुटुंबाला पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त करण्यात येत आहे.









