आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. धाराशिव जिल्ह्यातील ३ हजार ३१५ बाधित शेतकऱ्यांना एकूण ३ कोटी ३९ लाख ३६ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, यासंदर्भातील शासन निर्णय सोमवारी (दि. १८) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात अवेळी झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त भागांचा सविस्तर अहवाल तयार केला होता. हा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर शासनाने मदतीस मंजुरी दिली आहे. महसूल विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एकूण १६६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.
यामध्ये सर्वाधिक फटका फळपिकांना बसला होता आणि १०७५ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले होते. तसेच ५५५ हेक्टर बागायती क्षेत्र आणि ३३ हेक्टर जिरायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. तालुकानिहाय पाहता, लोहारा तालुक्यात सर्वाधिक ५९७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्याखालोखाल तुळजापूरमध्ये ४४६ हेक्टर, वाशीमध्ये २६२ हेक्टर, उमरगा येथे १६२ हेक्टर तर नळदुर्ग अप्पर तहसील अंतर्गत १९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.
धाराशिव, परंडा आणि कळंब या तालुक्यांमध्ये मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झाले नव्हते. शासनाच्या निकषानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी ८ हजार ५०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७ हजार रुपये आणि फळपिकांसाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपये मदत देण्यात येणार आहे.
संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत लवकरच जमा करण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांत जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. प्रशासनाने दोन्ही महिन्यांचे स्वतंत्र पंचनामे करून वेगवेगळे अहवाल शासनाकडे सादर केले होते. मार्च महिन्यातील नुकसानीसाठी आता मदतीला मंजुरी मिळाल्याने बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.








