आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सरपंच पदाच्या नव्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शासनाच्या सुधारित आदेशानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये बदल करण्यात आल्याने धाराशिव तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत पुन्हा काढण्यात येत आहे.
त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. शासनाने दि. ०४ मे २०२६ रोजी जारी केलेल्या शुद्धीपत्रकानुसार ओबीसी प्रवर्गातील एक जागा कमी करून ती खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आली आहे. यामुळे धाराशिव तालुक्यातील आरक्षणाच्या आकडेवारीत बदल झाला असून ओबीसीच्या जागा ३० वरून २९ तर खुल्या प्रवर्गाच्या जागा ५७ वरून ५८ झाल्या आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर आज सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, धाराशिव येथे नव्याने आरक्षण सोडत पार पडणार आहे. विशेष म्हणजे या बदलाचा परिणाम केवळ दोन ग्रामपंचायतींवर होणार असला तरी त्या दोन गावांची निवड कोणती होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
धाराशिव तालुक्यात एकूण ११० ग्रामपंचायती असून जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींचा समावेश या तालुक्यात आहे. त्यामुळे आरक्षणातील छोटासा बदलही स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम करणारा ठरत आहे.
मागील दहा महिन्यांपासून अनेक इच्छुकांनी गावपातळीवर बैठक, संपर्क मोहीम आणि संघटनात्मक बांधणी सुरू केली होती. काही ठिकाणी संभाव्य उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र नव्या सोडतीच्या निर्णयामुळे अनेकांचे राजकीय गणित विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता असून अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर गावागावांत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
अशा परिस्थितीत आज होणारी सरपंच आरक्षण सोडत अनेक इच्छुकांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरवणारी मानली जात आहे. त्यामुळे सकाळपासूनच इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे लक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लागले आहे.








