खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांचे आवाहन
प्रतिनिधी / धाराशिव
दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मुंबई येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी होणाऱ्या या दसरा मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असून, दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांसाठी ठाकरे गटाकडून विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे. यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी नियोजन केले आहे.
मुंबईतील दसरा मेळावा ही परंपरा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून सुरू केली होती. दसरा मेळाव्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक जाणार असून अशा तमाम बाळासाहेब प्रेमी शिवसैनिकांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने स्पेशल तुळजाभवानी एक्सप्रेस रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रेल्वे ही धाराशिव रेल्वे स्थानकावरून सोमवारी रात्री 10.30 वा. मुंबईकडे रवाना होईल. तत्पूर्वी शिवसैनिकांच्या जेवणाची व्यवस्था सदर रेल्वेमध्ये करण्यात आली आहे. उमरगा, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, कळंब, वाशी, तसेच औसा व निलंगा तालुक्यातील शिवसैनिकांनी धाराशिव स्थानकावरुन रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करावयाचे आहे. तसेच बार्शी,भूम,परंडा या तालुक्यातील शिवसैनिकांनी बार्शी स्थानकावरून सदर मेळाव्याकरिता जाण्यासाठी रात्री 11.00 वा. हजर राहावे , असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जे इतर शिवसैनिक आहेत त्यांना पुणे येथे 24 रोजी रात्री 2.00 वा स्पेशल रेल्वेने मुंबईकडे रवाना होता येणार आहे. 24 रोजी सायं. 11.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनल येथून दादर-कल्याण-पुणे-बार्शी-धाराशिव येथे 25 रोजी सकाळी 10.00 वा पोहचेल. विशेष रेल्वेने प्रवास करण्यासाठी नियोजन करावे आणि मेळाव्याला मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच जिल्हाप्रमुख तथा धाराशिव-कळंबचे आमदार कैलास घाडगे-पाटील, संपर्क प्रमुख लातूर शंकरराव बोरकर, ज्ञानेश्वर पाटील, दिनकर माने, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर,संतोष सोमवंशी (लातूर सहसंपर्क प्रमुख) शिवसेना जेष्ठ नेते केशव उर्फ बाबा पाटील, जिल्हा प्रमुख रणजित पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, शामलताई वडणे, सर्व तालुका प्रमुख व शहर प्रमुख यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. सदर दसरा मेळावाकरिता मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी हजर रहावे,असे अवहान करण्यात आले आहे.