गणेश गायकवाड/ तामलवाडी
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी गावागावात लढा उभारला जात असून, लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला जात आहे. तसे फलक गावाच्या वेशीवर लावले जात आहेत. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बुद्रुक) येथील उपसरपंच विजयकुमार जाधव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. गावातील जगदंबा उत्सवासमोर गावातील युवक कार्यकर्ते व नागरिकांसमोर त्यांनी आपली भूमिका मांडून राजीनामा बाबतची घोषणा केली. त्यांनी राजीनामा सरपंच गीता वाघमोडे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी संग्राम राजेपांढरे, सोमनाथ मोरे, योगेश गवळी, दयानंद चव्हाण, सुधाकर वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजयादशमीच्या मुहूर्तावर लोक भावनेचा आदर करत मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यास लोकप्रतिनिधींची ही सोबत असावी या भावनेतून आपण हा निर्णय घेतल्याची त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मराठा आरक्षण लढ्यापासून मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी अलिप्त असल्याची दिसत आहे. इतर समाजाचे लोकप्रतिनिधी आपल्या समाजासाठी पुढे येऊन नेतृत्व करताना दिसतात. मात्र, मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रातील आमदार , खासदार व इतर लोकप्रतिनिधी कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे जनमतात लोकप्रतिनिधीबद्दल असंतोष आहे. शिवाय काहीजण आरक्षण विरोधी भूमिका घेताना ही दिसत आहेत. मात्र कोणत्याही पदापेक्षा सर्वसामान्य गरिबांच्या आरक्षणासाठीचा लढा हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण जनतेने दिलेल्या पदाचा त्याग करत आहोत अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील प्रथमच लोकप्रतिनिधीने राजीनामा देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनीही मराठा आरक्षणास संपूर्ण पाठींबा जाहीर केला आहे. आरक्षण न मिळाल्यास संपूर्ण पंचायतीचे सदस्य ही राजीनामा देणार असल्याचे पत्र सदस्यांनी वरिष्ठांना दिले आहे. जनमताचा आदर करणारे, त्यानुसार निर्णय घेणारे प्रतिनिधी हे सशक्त लोकशाहीसाठी खूप लाभदायी असते. त्यांच्या या निर्णयाचे समाजाने कौतुक केले आहे. तसेच यानंतर अनेक जण या प्रकारे सहकार्य करतील अशी अपेक्षाही लोकांमधून व्यक्त केली जात आहे. यावेळी जनसमुदायाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात घोषणा दिल्या. याप्रसंगी नागनाथ जाधव, बालाजी चुंगे, समाधान चौगुले, नेताजी जाधव, शिवाजी गुंड, संभाजी जाधव, हनुमंत चुंगे, योगेश पाटील, कृष्णा चौगुले, सुरेश चौगुले, धनाजी चौगुले, गोपाळ जाधव, संजय करंडे, भैरू चौगुले, महादेव चव्हाण, संकेत करंडे, अक्षय पाटील यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधी आरक्षण मग बाकीचे बघू
मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजातील आमदार, खासदार हे नेतेच उदासीन आहेत. जरांगे पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी मी पदाचा त्याग केला आहे. आधी आरक्षण मग बाकीचे काय असेल ते.
विजयकुमार जाधव, उपसरपंच पिंपळा (बुद्रुक)
राजीनामा सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल
विजयकुमार जाधव यांनी दिलेला राजीनामा जिल्ह्यातील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणाची ठिणगी पेटत आहे. प्रत्येक गावात आमदार, खासदार यांना गावबंदी केली जात असून येणाऱ्या काळात याची तीव्रता वाढू शकते.