प्रतिनिधी/ कळंब
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कळंब शहरामध्ये विशाल धम्म रॅली काढण्यात आली तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करून धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागामध्ये सकाळी प्रत्येक विहारात त्रिशरण पंचशील घेऊन धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
कळंब शहरातील समता नगर येथील संबोधी बुध्द विहारमध्ये आशा हजारे,निलावती समुद्रे,शांताबाई टोपे,लता आवाड, लक्ष्मी गरड ,जयश्री वाघमारे, शुकक्षाला गजधने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानिमित्ताने महिलासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रांगोळी स्पर्धा,जनरल नाॅलेज, संगीत खुर्ची अशा विविध आठ प्रकारामध्ये सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकांना तारामती शिवाजीराव वाघमारे यांच्या स्मरणार्थ बक्षीस देण्यात आले.
कल्पना नगर व यशवंत नगर लुंबीनी बुध्द विहार येथे आर. बी. वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचबरोबर भीमनगर येथील भीमाई महिला मंडळाच्या वतीने आशा गायकवाड, सुनंदा सुनील गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. इंदिरा नगर बुध्द विहारामध्ये तसेच डॉ .आंबेडकर पुतळ्याजवळ कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे जेष्ठ बौध्द उपासक सुखदेव दादा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व लहान मुलींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. एमपीएससी परिक्षेत पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 परिक्षा उत्तीर्ण करणारे डॉ संदिप सुरेंद्र शिलवंत यांचा बौध्द बांधवांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. विशाल धम्म रॅलीची सुरुवात क्रांती भुमी भीमनगर येथून झाली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ते एसबीआय बँक ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक, राष्ट्रमाता जिजाऊ चौक,साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,अहिल्याबाई होळकर चौक ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर ठिकाणापर्यंत ही विशाल धम्म रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये शुभ्र वस्त्र परिधान करुन सर्व बौद्ध उपासक सहभागी झाले होते.