आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांसह वाटणाऱ्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे. अशीच एक घटना परंडा तालुक्यात घडली आहे. परंडा तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात एका महिलेचा चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहिणी संदीप पवार (वय ३०, रा. पांढरेवाडी ता. परंडा जि. धाराशिव) या बुधवारी (दि.२०) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पांढरेवाडी शिवारातील मोहिते वस्ती जवळील कॅनॉल रोडवरून लाकडे घेऊन पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी लोल्या पिंटू काळे व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून भोवती रिंगण घातले.
यातील एका आरोपीने मोहिणी पवार यांच्या गळ्याला चाकू लावून धमकावत त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण तसेच एक तोळ्याचे सोन्याचे फुले-झुबे असा एकूण सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी मोहिणी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात आरोपी लोल्या पिंटू काळे व अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.








