आरंभ मराठी / धाराशिव
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका पुन्हा एकदा उडाला असून अवघ्या दहा दिवसांत चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक तसेच शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. आधीच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झालेली असताना आता इंधनाच्या वाढत्या किमतींनी महागाईचा आणखी फटका बसू लागला आहे.
आजपासून (दि.२५) पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २ रुपये ७३ पैसे, पॉवर पेट्रोलमध्ये २ रुपये ७३ पैसे तर डिझेलमध्ये २ रुपये ८१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. १५ मे, १९ मे, २३ मे आणि २५ मे या चार दिवसांत सलग दरवाढ झाल्यामुळे वाहनधारकांच्या इंधन खर्चात प्रतिलिटर सुमारे ८ रुपयांची वाढ झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात पेट्रोलचा दर आता ११२ रुपये ६० पैसे प्रति लिटरवर पोहोचला असून डिझेल ९९ रुपये २५ पैसे प्रति लिटर झाले आहे.
या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दरम्यान, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. पेरणीपूर्व मशागतीसाठी लागणाऱ्या नांगरणी, मोगडणी, कुळवणी तसेच रोटाव्हेटरच्या कामांचे दर ट्रॅक्टर चालकांनी प्रति एकर शंभर रुपयांनी वाढवले आहेत.
त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. इंधन दरवाढीचा परिणाम परिवहन क्षेत्रावरही दिसून येत आहे. राज्य परिवहन महामंडळाचा तोटा दिवसेंदिवस वाढत असून जून महिन्यापासून एसटी तिकिट दरवाढीचे संकेत परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनाही आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. इंधन दरवाढीमुळे उद्योग, वाहतूक, शेती आणि किरकोळ बाजारपेठांवर मोठा परिणाम होणार असून महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकारने एकदम मोठी दरवाढ न करता टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा मार्ग स्वीकारल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी त्यांना होत असलेल्या तोट्याचा हवाला देत पेट्रोलमध्ये प्रतिलिटर १८ रुपये तर डिझेलमध्ये १६ रुपये दरवाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांतही इंधन दरवाढीची मालिका कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








