आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, कौडगाव परिसरातील अवैध मुरूम वाहतुकीप्रकरणी टिप्पर चालकासह चौघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल पथकाला दमदाटी करून टिप्परमधील मुरूम खाली करण्यास मदत केल्याचा आरोप संबंधितांवर करण्यात आला आहे. याबाबत नायब तहसीलदार विशाखा अविनाश बलकवडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
धाराशिव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर कठोर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी डॉ मृणाल जाधव यांनी महसूल विभागाला दिले होते. त्यानुसार दिनांक २६ मे रोजी सायंकाळी कौडगाव परिसरात अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार बलकवडे यांनी महसूल पथकासह रात्री कारवाईसाठी कौडगाव येथे धाव घेतली. रात्री सुमारे ९.२० वाजण्याच्या सुमारास कौडगाव बसस्थानकाजवळ एमएच २५ एन ९९०९ क्रमांकाचा टिप्पर अडवून तपासणी करण्यात आली.
चालकाने आपले नाव स्वप्नील धनाजी थोरात असे सांगितले. टिप्परमध्ये सुमारे चार ब्रास मुरूम आढळून आले. मात्र, त्या मुरूम वाहतुकीसंदर्भातील कोणताही अधिकृत परवाना चालकाकडे नसल्याचे निदर्शनास आले.
महसूल पथकाने पुढील कारवाईसाठी टिप्पर तहसील कार्यालयात आणण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ग्राममहसूल अधिकारी विकास नागटिळक व मनोज क्षीरसागर हे टिप्परमध्ये उपस्थित होते. दरम्यान, कौडगाव येथील एका पेट्रोलपंपावर डिझेल भरण्यासाठी टिप्पर थांबविण्यात आला. त्याचवेळी दोन दुचाकींवरून चार जण तेथे आले. त्यातील एक जण बालाजी विरसिंह थोरात असल्याचे समोर आले.
फिर्यादीनुसार, संबंधितांनी टिप्पर तहसील कार्यालयात नेऊ नये, अशी दमदाटी करत महसूल अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत वाद घातला. तसेच टिप्परमधील मुरूम पेट्रोलपंप परिसरात खाली करण्यास मदत केली. त्यानंतर टिप्पर चालकाने वाहन वेगाने बार्शीच्या दिशेने नेले. गाडीत बसलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना “खाली उतरा, अन्यथा गाडी खड्यात घालीन,” अशी धमकी दिल्याने भीतीपोटी दोन्ही कर्मचारी खाली उतरले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे. संबंधितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, दमदाटी करणे तसेच अवैध गौण खनिज वाहतुकीस मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, धाराशिव तालुक्यातील करजखेडा मंडळातील अवैध गौण खनिज तपासणी पथकानेही स्वतंत्र कारवाई केली.
या कारवाईदरम्यान नायब तहसीलदार शिंदे, मंडळ अधिकारी श्रीमती सुकेशनी कांबळे तसेच मंडळातील ग्राममहसूल अधिकारी उपस्थित होते. कारवाईत जप्त करण्यात आलेले वाहन बेंबळी पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले असून, संबंधित वाहनाविरुद्ध पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयामार्फत उपविभागीय अधिकारी धाराशिव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
धाराशिव तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी मंडळनिहाय विशेष तपासणी पथके सक्रिय करण्यात आल्याची माहिती तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी दिली.









