आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २५) मंत्रालयात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक होणार असून, जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेऊन आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे.
यापूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी धाराशिवसाठी विशेष पॅकेजची मागणी केली होती. त्यामुळे या बैठकीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पाणीसाठ्याची स्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. जिल्ह्यातील २२५ प्रकल्पांपैकी १७५ हून अधिक प्रकल्प कोरडे पडले असून, केवळ तीन प्रकल्पांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व प्रकल्पांतील एकत्रित उपयुक्त पाणीसाठा अवघा चार टक्क्यांवर आल्याची स्थिती आहे. मागील महिन्यात सुमारे आठ टक्के असलेला पाणीसाठा महिनाभरात ४ टक्क्यांवर घसरल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात टँकरची संख्या अद्याप मर्यादित असली तरी पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींची संख्या तीनशेवर गेली आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये धाराशिवची पाणीटंचाई सर्वाधिक गंभीर असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. पावसाचे अनिश्चित प्रमाण, भूजल पातळीत होणारी घट आणि मर्यादित जलसाठा यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील अत्यल्प पाणीसाठ्याची वस्तुस्थिती मांडत जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज मंजूर करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीत विशेष निधी आणि पाणीटंचाई निवारणासाठी कोणत्या उपाययोजना निश्चित होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. बैठकीत उपलब्ध जलसाठ्याचा सविस्तर आढावा, ग्रामीण व शहरी भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, पर्यायी जलस्रोतांचा वापर, आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि अधिग्रहित विहिरींच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा होणार आहे. तसेच संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून पाणीटंचाई निवारणासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.
या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, ग्रामविकास व पंचायत राज तसेच मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ सचिव, धाराशिवचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विभागांचे अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते तसेच जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील कोणत्याही गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, हा या नियोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.










