आरंभ मराठी / तुळजापूर
बनावट ५३ टक्के शारीरिक दुर्बलतेचे कार्ड वापरून एसटी प्रशासनाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच एसटी चालक व महिला वाहकास शिवीगाळ, दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन बापुराव लोखंडे व राम शिंदे (रा. आंबेजवळगे, ता. जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एसटी महामंडळाच्या धाराशिव आगारातील चालक उमेश दिलीप पवार (वय ४४, रा. भवानीनगर, धाराशिव) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी कावलदरा ते तुळजापूर बसस्थानकादरम्यान उमेश पवार बस चालवत होते. यावेळी आरोपींनी ५३ टक्के शारीरिक दुर्बलतेचे बनावट कार्ड वापरून एसटी प्रशासनाची व शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपींनी चालक व वाहकास शिवीगाळ करून, ‘माझे कार्ड दे, नाही तर तुला या रोडवर ड्युटी करू देणार नाही,’ असे म्हणत दमदाटी केली. ‘बघून घेतो,’ अशी जिवे ठार मारण्याची धमकी देत बस आडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याशिवाय महिला वाहकास निलंबित करण्याची धमकी देत अरेरावीची भाषा वापरण्यात आली. ‘तुम्ही वरिष्ठांचे आदेश पाळत नाहीत का?’ असे म्हणत निलंबनाचा दबाव आणून बनावट कार्ड असतानाही वाहकास वन फोरचे तिकीट देण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अधिकाराचा गैरवापर केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी उमेश पवार यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, २२१, २३८, ३१८(४), ३३६(३), ३४०(२), १२६, ३५१(२)(३), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.











