आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपरिषद प्रशासनाने शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोमवारपासून (दि.७) धरपकड मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत नगरपरिषदेच्या पथकाने आज शहरातील सात मोकाट जनावरे पकडून ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते, चौक तसेच रहदारीच्या ठिकाणी मोकाट जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांनी आता आपली जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे. धरपकड केलेल्या जनावरांच्या मालकांनी आपली जनावरे तातडीने ताब्यात घेऊन अटकाव करून ठेवावीत, अन्यथा पकडलेली जनावरे स्थानिक गोशाळेत देण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मोकाट जनावरे गोशाळेत दिल्यानंतर संबंधित जनावरांची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पशुपालकांनी प्रशासनाच्या सूचनेकडे गांभीर्याने पाहून जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, धाराशिव शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या प्रश्नावरही नगरपरिषद प्रशासनाने कारवाईचा पवित्रा घेतला आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ व सार्वजनिक जागांवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना प्रशासनाकडून आज शेवटची मुदत देण्यात आली आहे.
दिलेल्या मुदतीत संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा नगरपरिषद प्रशासनाकडून ते हटविण्यात येणार आहे. मोकाट जनावरांविरोधात ज्याप्रमाणे धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे, त्याच पद्धतीने मंगळवारपासून अतिक्रमणाविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.










