आरंभ मराठी / धाराशिव
परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात धाराशिव जिल्ह्याला ५० बसचे गिफ्ट दिले आहे. लवकरच या बस धाराशिव जिल्ह्याला मिळतील अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आलेल्या सरनाईक यांनी पूर्वसंध्येला पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी तुळजाभवानी मंदिर आराखडा, नवीन एसटी बस स्थानक, एसटीची भाडेवाढ या विषयावर मते मांडली.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराच्या मूळ गाभाऱ्याला आणि स्थापत्य कलेला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाईल असे सांगितले. परिवहन खात्याचा मंत्री म्हणून एसटी महामंडळाची अवस्था सुधारण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. एसटीला सध्या दिवसाला तीन कोटी रुपये तोटा होत आहे. महिन्याला हा तोटा शंभर कोटींपर्यंत जातो. दरम्यान, जिल्ह्यातील बसेसची अवस्था अत्यंत खराब झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे नवीन बस देण्याची मागणी करण्यात येत होती. युवा नेते आनंद पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट घेऊन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे नवीन बसची मागणी केली होती. त्यानंतर आज धाराशिव बसस्थानकात कामगार युनियनच्या वतीने हीच मागणी करण्यात आली होती.
मागच्या काळात महायुती सरकारने महिलांसाठी अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांना देखील मोफत प्रवास केला आहे. एवढ्या सवलती देत असताना महामंडळाचा खर्च वाढत आहे. दरवर्षी भाडेवाढ करण्यापेक्षा तीन वर्षानंतर ही एकदाच केलेली ही भाडेवाढ आहे. त्यामुळे या भाडेवाढीचा सामान्य नागरिकांवर जास्त फरक पडलेला नाही असे ते म्हणाले.
धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेत पडलेल्या दोन गटावरून त्यांनी माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांची बाजू घेतली. सावंत हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून, सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा योग्य आदर केला पाहिजे असेही सरनाईक यावेळी म्हणाले. धाराशिवचे बस स्थानक एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून, सर्व सोयीसुविधा असलेले बस स्थानक उत्तम दर्जाचे कसे होईल याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे ते म्हणाले.