आरंभ मराठी / धाराशिव
प्रजासत्ताक दिनानिमित्त धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन बैठक पार पडली. त्यापूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा नियोजन बैठकीत सरनाईक यांनी 31 मार्च पर्यंत प्राधान्याने पूर्ण करावयाच्या कामांचा आराखडा देऊन प्रशासनाला गतिमान काम करण्याच्या सूचना दिल्या. नियोजन बैठकीत महावितरण, पीक कर्ज, जलजीवन मिशन, बांधकाम विभाग, क्रीडा विभाग, तुळजापूर मंदिर आराखडा या विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. पीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नसल्यामुळे यापुढे बँकांनी जबाबदारीने पीक कर्जाचे वितरण करावे अशा सूचना त्यांनी सर्व बँकांना दिल्या.
जलजीवन मिशनच्या कामात गती नसल्यामुळे पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. 594 मंजूर कामांपैकी आतापर्यंत फक्त 246 कामेच पूर्ण झाली आहेत. या कामामध्ये कंत्राटदारांनी रस्ते खोदून जर त्याची दुरुस्ती केलेली नसेल तर त्याकडे लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. पूर्ण झालेल्या 246 कामामध्ये खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली आहे का याचा सविस्तर अहवाल एक महिन्यात जिल्हाधिकारी यांना सादर करण्याची सूचना सरनाईक यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिली.
क्रीडा विभागाचे कामकाज पाहून सरनाईक यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. धाराशिव जिल्ह्यात मॅटवरील कुस्तीसाठी मॅट आणि इतर साधने उपलब्ध नसल्यामुळे गुणवत्ता असणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होत असल्यामुळे क्रीडा अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खेळाडूंना योग्य ती उपकरणे उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना त्यांनी दिल्या.
येणाऱ्या दोन महिन्यात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीमध्ये चांगले शौचालय आहे की नाही याची खात्री करून ज्या शाळांमध्ये शौचालय नाही त्या ठिकाणी दोन महिन्यांच्या आत शौचालय बांधण्यासाठी वर्क ऑर्डर काढण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या व्यवस्थित आहेत का हे तपासून नवीन अंगणवाडी बांधकामाच्या वर्क ऑर्डर काढण्यासह त्यांनी सांगितले. शेतातील ट्रान्सफॉर्मर जळाल्यास तो दुरुस्त करेपर्यंत शेतकऱ्यांची पिके जळून जातात.
हे होऊ नये यासाठी जिल्ह्यात पॉवर ऑन व्हील द्वारे शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
धाराशिव, तुळजापूर व उमरगा शहरात सीसीटीव्ही
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर आणि उमरगा या तीन शहरात काही दिवसात सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली. शहरांना सुरक्षित ठेवण्यासाठी या सीसीटीव्हीचा उपयोग होईल असेही ते म्हणाले. सध्या याची प्रक्रिया गतिमान असून, तीनही शहरात सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. या तीन शहरांसोबतच बाकीच्या पाच तालुक्यांच्या शहरातही सीसीटीव्ही बसवण्याचे काम हाती घेणार असल्याचे सरनाईक म्हणाले.
तुळजापूर मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण
यावेळी बैठकीत तुळजापूर मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून हे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी मंदिर विकास आराखड्याची सविस्तर माहिती घेऊन काही सूचना केल्या.
यावेळी पुरातत्व विभागाच्या लोकांना त्यांनी प्रश्न विचारून शंका निरसन केले. मंदिराचे काम करताना हे काम तीनशे ते साडेतीनशे वर्षे टिकायला हवे असेच करा अशी सूचना त्यांनी केली.
खेळीमेळीच्या वातावरणात बैठक
जिल्हा नियोजनाची ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सरनाईक यांनी उबाठा गटाचे खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील व आमदार प्रवीण स्वामी यांच्याशी देखील हसतखेळत संवाद साधला. आमदार राणा पाटील यांनी तुळजापूर मंदिर विकास आराखड्याच्या बाबतीत सरनाईक यांना माहिती दिली.
डॉ. तानाजीराव सावंत यांची बैठकीला दांडी
मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या डॉ तानाजीराव सावंत यांनी जिल्हा नियोजन बैठकीला दांडी मारली. पालकमंत्री पहिल्यांदा जिल्ह्यात आलेले असताना त्यांच्या स्वागताला आणि जिल्हा नियोजन बैठकीला सावंत उपस्थित न राहिल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला होता. बैठक संपल्यानंतर तानाजी सावंत यांचे पुतणे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी पालकमंत्र्यांची काही वेळ भेट घेऊन चर्चा केली.
या बैठकीला पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणा पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, निमंत्रित सदस्य महेंद्र धुरगुडे, निमंत्रित सदस्य नवनाथ जगताप, निमंत्रित सदस्य महेश नलावडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.