महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी
प्रतिनिधी / नळदुर्ग
नळदुर्ग शहराची लोकसंख्या चाळीस हजाराच्या आसपास असून परिसरातील रोजचा संपर्क असलेल्या 60-70 गावाची लोकसंख्या जवळपास दीड-दोन लाख आहे. यातील बहुतांश लोकांचा प्रमुख उद्योग हा शेतीच आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून आणि नळदुर्ग हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
मनसेने राज्याच्या सहकार मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग हे दोन राष्ट्रीय महामार्ग लाभलेले शहर आहे. परिसरातील 70 गावाचे केंद्रस्थान आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सोलापूर,तुळजापूर,लातूर आदी ठिकाणी स्वतःचे वाहन करून पदरमोड करत मालाची विक्री करावी लागत आहे. कष्ट करून घाम गाळून शेतात पीकविलेला माल कधी कधी कवडीमोल दराने विकावा लागत आहे. नळदुर्ग येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यास शेती उद्योगाला चालना मिळेल, शिवाय शेतकऱ्यांसाठी सोयीचे होईल. त्यामुळे नळदुर्गसारख्या मोठ्या शहरात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती असणे गरजेचे आहे.
निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,शहर संघटक रवि राठोड आदींच्या स्वाक्षरी आहेत.