पणन अधिकाऱ्यांची माहिती; खरेदीला मुदतवाढ मिळल्याच्या वृत्ताने शेतकऱ्यांसह पणन अधिकाऱ्यांची गोची
आरंभ मराठी / धाराशिव
हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी २४ दिवसांची मुदतवाढ मिळाल्याचे वृत्त सोमवार रात्रीपासून विविध समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. मात्र, हे वृत्त निराधार असून, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारने कसलीही मुदतवाढ दिली नसून, यापुढे सोयाबीनची खरेदी होणार नाही,असे जिल्हा पणन अधिकारी मनोजकुमार वाजपेयी यांनी सांगितले.
हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्र ६ फेब्रुवारीला रात्री बंद करण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या २१ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी असल्यामुळे खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती.
सोमवारी ( दि.१०) रात्रीपासून काही इलेक्ट्रॉनिक मीडियानी सोयाबीन खरेदीस २४ दिवसांची मुदतवाढ मिळाल्याची बातमी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. काही शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर येऊन केंद्र कधी सुरू होणार याची विचारपूस सुरू केली होती. त्यामुळे मंगळवारी सकाळी पणन अधिकारी देखील चक्रावून गेले. शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीस मुदतवाढ दिल्याच्या बातम्या पणन अधिकारी यांना दाखवल्यानंतर पणन अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली असता, मुदतवाढ मिळाल्याचे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट झाले.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराश पडली असून, सोयाबीन खरेदीस कसलीही मुदतवाढ मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारातच सोयाबीन विकावे लागणार आहे.