प्रतिनिधी / धाराशिव
पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची पिके वाळत आहेत. पिके जगविण्यासाठी शेतकरी पर्यायी स्त्रोताद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न करतात, मात्र, महावितरणकडुन वीज उपलब्ध होत नाही. त्यामुळे महावितरणने विजपुरवठा सुरळीत न केल्यास गय केली जाणार नाही, शेतकऱ्यांसाठी अंगावर कितीही केसेस झाल्या तरी मी त्याची पर्वा करणार नाही, असा इशारा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महावितरणला दिला आहे.आज सकाळी खासदार ओमराजे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणसमोर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात शिवसैनिकांसह शेतकरीही सहभागी होणार आहेत.
जुन,जुलै महिन्यामध्ये पावसाची टक्केवारी अत्यंत कमी होती तर ऑगस्ट पुर्णतः कोरडा गेला आहे. पिकाला पाण्याची आवश्यकता असताना पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन पाण्याअभावी पिके सुकुन वाळु लागली आहेत. अशावेळी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे अन्य स्त्रोत आहेत,ते पिकाना पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विज उपलब्ध नसल्याचे दिसत आहे, असंख्य शेतकऱ्यांकडुन या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ठरवुन दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक वेळ विज जात असल्याने कोणत्यावेळी पाणी द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांतुन विचारला जात आहे. महावितरण कंपनीकडुन जाणीवपुर्वक शेतकऱ्याना त्रास देण्याचा हा प्रकार अत्यंत चिड आणणारा आहे, त्यामुळे कंपनीकडुन यापुढे असा प्रकार केल्यास त्यांची गाठ माझ्याशी असेल एवढ लक्षात घ्यावे.असा इशारा खासदार राजेनिंबाळकर यांनी दिला आहे.
आजच्या आंदोलनात शेतकरीही सहभागी होणार
महावितरण कंपनीला इशारा देण्यासाठी आज सोमवारी सकाळी 11 वाजता आमदार कैलास पाटील, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शेतकरी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत महावितरणच्या विरोधात धरणे आंदोलन केले जाणार आहे. सुरुवातीला लोकशाही मार्गाने इशारा देण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनाने फरक पडला नाही तर पुन्हा वेगळा पर्याय अवलंबावा लागेल,असेही खासदार ओमराजे यांनी सांगितले आहे. अगोदरच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा संयम अजुनही टिकुन आहे, याचा अर्थ ते शांतच राहतील असे नाही, त्यांचा संयम सुटल्यास कंपनीला पळताभुई थोडी होईल, त्यामुळे व्यवस्थेत बदल करा,अन्यथा तुमची गय करणार नसल्याचा सल्ला ओमराजे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.