मराठा तरुणांचाही लक्षणीय सहभाग
प्रतिनिधी / वाशी
मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षण संबंधी समाजाच्या जनजागृती साठी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य कँडल मार्च काढण्यात आला. गुरूवारी (दि. २६) सायंकाळी सात वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून कँडल मार्चची सुरूवात झाली. यावेळी शहरातील मराठा समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विशेष म्हणजे या कँडल मार्चमध्ये एरव्ही परस्पर विरोधात भूमिका घेणारे राजकीय नेते एकत्र आल्याने समाज बांधवांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले.
मराठा समाजाचे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते यांनी आपले पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून एकमुखाने या कँडल मार्चमध्ये सहभाग घेतला. या कँडल मार्चला सर्व समाजाच्या नागरिकांकडून पाठिंबा देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेला कँडल मार्च छत्रपती शिवाजी नगर मार्ग जुनी वेस ,वर्तक चौक, लक्ष्मी रोड या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला.